|
सायफिलीसची लागण झालेल्या अनेक व्यक्तींना कित्येक वर्षे कोणतीही
लक्षणे दिसून येत नाहीत.
प्राथमिक अवस्था
सायफिलीसच्या प्राथमिक अवस्थेत एक किंवा अनेक फोड दिसून येतात.
सायफिलीसचे संक्रमण आणि त्याची पहिली लक्षणे दिसणे यांच्या मधला कालावधी
हा 10 ते 90 दिवसांचा (सरासरी 21 दिवस) असू शकतो. हे फोड सामान्यतः
घट्ट, गोल, लहान, आणि वेदनारहित असतात. ज्या ठिकाणी सायफिलीसनं
शरीरात प्रवेश केला आहे तिथे ते उगवतात. तथापि, पुरेसे उपचार केले नाहीत
तर, हे संक्रमण दुस-या टप्प्यात पोचते.
दुसरा टप्पा
या टप्प्यामधे त्वचेवर पुरळ आणि श्लेष्म पडदा विकृती निर्माण होते. हे
पुरळ सामान्यतः खाजत नाहीत. ते खडबडीत, लाल, किंवा लालसर तपकिरी
बिंदूसारखे दोन्ही हातांच्या किंवा पायांच्या तळव्यांवर दिसून येतात.
तथापि, वेगळ्या आकारातील पुरळ हे शरीराच्या इतर भागांवर देखील येऊ शकतात,
काहीवेळा ते इतर रोगांमुळे होणा-या पुरळांसारखे दिसतात. या
पुरळांशिवाय, दुस-या टप्प्यातील सायफिलीसच्या लक्षणांमधे, ताप येणे,
सुजलेल्या कंठग्रंथी, घसा खवखवणे, केसांचे पुंजके गळणे, डोकेदुखी, वजन कमी
होणे, स्नायूंमधे वेदना आणि थकवा यांचा समावेश होतो.
नंतरचा टप्पा
जेव्हा दुस-या टप्प्यातील लक्षणे नाहीशी होतात तेव्हा सिफिलीसच्या
नंतरच्या टप्प्याला सुरुवात होते. यामधे शरीराच्या आतील अवयवांचे नुकसान
होते. त्यात मेंदू, नसा, डोळे, रक्तवाहिन्या, यकृत, हाडे, आणि संधींचा
समावेश होतो. हे अंतर्गत नुकसान अनेक वर्षांनंतर दिसून येते. सिफिलीसच्या
उशीराच्या टप्प्यातील चिन्हे आणि लक्षणांमधे स्नायूंच्या हालचालीत समन्वय
राखण्यात अडचण येणे, अर्धांगवायू, बधिरता, हळूहळू अंधत्व येणे, आणि
स्मृतिभ्रंश यांचा समावेश होतो. या नुकसानामुळे मृत्यु देखील ओढवू
शकतो.
|