अॅस्पिरिनमुळे लाखो लोकांना हृदयविकारापासून संरक्षण मिळू शकते
अॅस्पिरिनमुळे भारताच्या ग्रामीण भागातील लाखो लोकांना हृदयविकारापासून संरक्षण मिळू शकते. एका अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की अॅस्पिरिनसारख्या अगदी कमी खर्चाच्या उपायाने ग्रामीण भागातील लाखो नागरिकांचे संभाव्य संकटापासून संरक्षण होऊ शकते.
हा अभ्यास भारताच्या दक्षिण भागात केला गेला कारण तेथे होणार्या मृत्यूंपैकी एक-तृतियांश मृत्यू हृदयरोग अथवा त्यासंबंधित कारणाने होतात. ह्यांवर कमी खर्चात उपाययोजना होण्याचे प्रमामदेखील तिथे अल्प आहे.
ऑस्ट्रेलियामधील सिडने येथील जॉर्ज इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल हेल्थ ह्या संस्थेच्या रोहिना जोशी म्हणतात “ह्या नव्य संशोधनातला सर्वात महत्वाचा निष्कर्ष असा आहे की हृदयरोगाचा प्रतिबंध करण्यासाठी कमी खर्चाचे तसेच गुणकारी असलेले कित्येक उपचार उपलब्ध असूनदेखील भारताच्या ह्या ग्रामीण भागात त्यांचा वापर करण्याचे प्रमाण अतिशय अल्प आहे.”
अॅस्पिरिनसारख्या प्रतिबंधात्मक उपायाचा अवलंब केल्याने हृदयरोगाचा धोका - विशेषतः एक झटका म्हणजे हार्ट अॅटॅक येऊन गेलेल्या व्यक्तींच्या बाबतीत - कमी करता येतो हे माहीत आहे.
तरीदेखील विकसनशील देशांमध्ये हे उपचार इच्छित प्रमाणात केलेले दिसत नाहीत. वास्तविक ह्या विकसनशील देशांमध्ये आढळणारे मृत्यूचे प्रमाण अशा औषधांनी खूपच कमी करता येईल.
अशा मृत्यूंपैकी अर्ध्यापेक्षा जास्त व्यक्तींचे वय ७० वर्षांपेक्षा कमी होते. ह्या बाबीचा कुटुंबासाठी पैसे मिळवणार्या व्यक्तींच्या जीवनाशी थेट संबंध आहे.
अभ्यासात असे दिसले आहे की भारताच्या ग्रामीण भागात हृदयरोगामुळे होणार्या एकूण मृत्यूंपैकी ४१ टक्के व्यक्तींचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी असते. समान वयोगटातल्या व्यक्तींच्या अशा मृत्यूंचे प्रमाण अमेरिकेत फक्त १७ टक्के आहे.
जॉर्ज इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात त्या पुढे म्हणतात "विकसित देशांच्या तुलनेत इथे हृदयरोगाने कमी वयामध्ये मृत्यू होत असल्याने त्याचा थेट आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक परिणाम होतो आहे. भारताच्या ग्रामीण भागात हा परिणाम अधिक आहे."
हा अभ्यास म्हणजे आंध्र प्रदेश ग्रामीण आरोग्य अभियान उर्फ APRHI चा एक भाग होता. ह्यासाठी जॉर्ज इन्स्टिट्यूट, ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठ तसेच भारतातील बैराजू फाउंडेशन, गंभीर आजार नियंत्रण केंद्र (CCDC) आणि CARE फाउंडेशननं परस्परांशी सहकार्य केले.
स्रोत - द हिंदू








